
रत्नागिरी, 10 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी टपाल विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात दोन हजार डझन हापूसचे वितरण झाल्याची माहिती रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली.
राजापुरातील ४० बागायतदारांकडून आतापर्यंत ५०० डझन रत्नागिरी हापूस आंबा थेट ग्राहकापर्यंत पोहोचला आहे. अजून साधारण १५०० डझन आंबा सांगली, कोल्हापूर, कराड, मुंबई, पुणे व नजीकच्या ठिकाणी सुरक्षितपणे वितरित करण्याची योजना असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.टपाल कार्यालयामार्फत गेली दोन-तीन वर्षे पुणे, मुंबईतही रत्नागिरी हापूस आंबा पोहोचवण्यात येत आहे. त्यासाठी आंब्याच्या बुकिंगची योजना सुरू केली आहे. २०२४-२५ मध्ये सांगली, कोल्हापूर या ठिकाणी १६६७ डझन आंबे, ८६२ आंबा बॉक्स पार्सलमधून सुरक्षितपणे वितरित करण्यात आले. त्या धर्तीवर ही योजना पुन्हा राबवण्यास सुरवात झाली आहे.
सांगली, कोल्हापूरमधील विविध टपाल कार्यालयांत ग्राहक हापूससाठी नोंदणी करतात. मागणीनुसार रत्नागिरी, राजापूरमधील शेतकऱ्यांकडून थेट दर्जेदार आंबा घेऊन तो पोस्टाच्या खास टपाल गाडीने तत्काळ दुसऱ्या दिवशी सांगली, कोल्हापूरमध्ये वितरित केला जातो. याकरिता रत्नागिरी टपाल विभागाने दोन अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यामुळे आंबा दर्जेदार व वेळेत पोहोचण्यासाठी विशेष लक्ष देत असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.अनेकदा बाजारात मिळणारा हापूस आंबा अस्सल आहे का, अशी शंका उपस्थित केली जाते. मात्र अस्सल रत्नागिरी हापूस आंब्याची घरपोच सेवा भारतीय डाक विभागाने सुरू केली आहे. शेतकरी ते ग्राहक अशी ही सेवा आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्याचा माल ग्राहकांपर्यंत योग्य मूल्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही बाजारपेठ मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी