
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा ४५ लाखांचा धनादेश कुटूबियांकडे सुपूर्द
नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका मधील इंदोरे गावात घडलेल्या भीषण अपघातानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दरगोडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले.
Narhari Zirwal यांनी दरगोडे कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत कुटुंबीयांना धीर दिला. या दुर्दैवी घटनेत इंदोरे गावातील सहा शालेय विद्यार्थ्यांसह दोन कुटुंबातील एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दिंडोरी येथील शिवाजीनगर परिसरात विहिरीत कार कोसळल्याने हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे गाव व तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंत्री झिरवाळ यांनी शासन पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, राज्य सरकारकडून तातडीने मदत जाहीर करण्यात आली असून देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. एकूण सुमारे 45 लाख रुपयांची रक्कम संबंधित वारसांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मंत्री झिरवाळ यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सर्व मदत व समन्वयाच्या सूचना दिल्या असून कुटुंबीयांना कोणतीही अडचण भासल्यास तातडीने सहाय्य उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले.
या भेटीदरम्यान स्थानिक अधिकारी, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV