
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल (हिं.स.) : शहरात पाइपमधून नैसर्गिक गॅस (पीएनजी) पुरवठ्यासाठी विस्तृत जाळे उभारण्याचे काम वेगाने सुरू असून घरोघरी तसेच उद्योगांना जोडणी देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. सध्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील सुमारे २५ उद्योगांना पीएनजीचा पुरवठा सुरू करण्यात आला असून एकूण सुमारे १५ टन गॅस वितरित केला जात आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन महिन्यांत मागणीप्रमाणे सर्व उद्योगांना पाइपमधून गॅस पुरवठा करण्याची क्षमता निर्माण केली जाईल, असा दावा कंपनीने केला आहे.
दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा थेट फटका एमआयडीसीतील उद्योगांना बसत आहे. जिल्ह्यातील ३०० ते ४०० कंपन्यांचे बॉयलर गॅसवर चालतात आणि त्यांना दररोज सुमारे ७२ टन गॅसची गरज भासते.
व्यावसायिक गॅस पुरवठा गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने उद्योगांमध्ये अडचणी वाढल्या आहेत. रिफायनरीमधून व्यावसायिक गॅस उत्पादन थांबवण्यात आले असून केवळ रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांना मर्यादित गॅस पुरवठा केला जात असल्याचे पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.
दुसरीकडे, हॉटेल उद्योगालाही गॅस टंचाईचा फटका बसला आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्याने आणि वाढीव २० टक्के गॅस पुरवठ्याचा निर्णय जाहीर होऊनही अंमलबजावणी न झाल्याने हॉटेल चालकांना नियमित पुरवठा मिळत नसल्याचे चित्र आहे.
एकूणच, पीएनजी पुरवठा सुरू झाल्यामुळे काही उद्योगांना दिलासा मिळत असला तरी व्यापक गॅस टंचाईचे संकट अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis