
जळगाव , 10 एप्रिल (हिं.स.) जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती, ती जळगाव ते इंदूर विमानसेवा आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. ‘फ्लाय-९१’ (Fly-91) या विमान कंपनीच्या माध्यमातून ही सेवा सुरू होणार असून, यामुळे जळगावच्या विकासाला आणि कनेक्टिव्हिटीला नवे पंख मिळणार आहेत.सध्या जळगाव विमानतळावरून ‘फ्लाय-९१’ (Fly-91) कंपनीकडून पुणे, गोवा आणि हैद्राबाद साठी विमानसेवा सुरु आहे. आता यात ‘इंदूर’ या महत्त्वाच्या शहराची भर पडणार असल्याने प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ‘फ्लाय-९१’कडून लवकरच जळगाव ते इंदोर विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे.जळगाव ते इंदूर हा मार्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी अनेक नागरिक नियमितपणे इंदूरला प्रवास करत असतात. तसेच इंदूरहून दिल्लीसह देशातील इतर मोठ्या महानगरांसाठी दैनंदिन विमानसेवा उपलब्ध असल्याने हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार आहे.
उन्हाळी वेळापत्रकानुसार ही विमानसेवा मूळतः १५ एप्रिल रोजी सुरू होणार होती; परंतु इंदूर येथील टर्मिनल १ पुन्हा सुरू करण्यासाठी बीसीएएस मंजुरी अद्याप मिळालेली नाही. सीआयएसएफ पथकाचीही प्रतीक्षा आहे. इंदूर येथील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इंदूर ते जळगाव विमान सेवेला प्रारंभ होऊ शकतो. मात्र, जळगाव येथील विमान प्राधिकरणाकडे तशी अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर