
बीड, 10 एप्रिल (हिं.स.)।
आष्टी तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पासाठी राज्य सरकारने २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार सुरेश धस यांनी या प्रकल्पासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. आमदार धस यांनी या प्रकल्पासाठी एकूण ५७०० कोटींची मागणी केली होती, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील हा निधी कामाला गती देण्यासाठी मोलाचा ठरणार आहे. या साठवण तलावामुळे तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे आष्टीच्या दुष्काळी भागात आनंदाचे वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis