रत्नागिरी : दोन दिवस बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह भगवती बंदरात
रत्नागिरी, 10 एप्रिल, (हिं. स.) : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या असलेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी (दि. ९ एप्रिल) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भगवती बंदर येथील शिवसृष्टीच्या बाजूला टेबल पॉइंटच्या कठड्याखाली सापडला. या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्
रत्नागिरी : दोन दिवस बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह भगवती बंदरात


रत्नागिरी, 10 एप्रिल, (हिं. स.) : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या असलेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी (दि. ९ एप्रिल) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भगवती बंदर येथील शिवसृष्टीच्या बाजूला टेबल पॉइंटच्या कठड्याखाली सापडला. या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल संजय किड्ये (वय ३०, रा. वरचीवाडी, मांडवी, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे. अमोल किड्ये ७ एप्रिल रोजी घरात कोणालाही न सांगता घरातून बाहेर निघून गेला होता. त्याच्या नातेवाइकांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला. अखेर त्याची आई संगती संजय किड्ये यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यावरून शहर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

दरम्यान, गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमाराला भगवती बंदर येथील टेबल पॉइंटच्या खाली काही नागरिकांना एका तरुणाचा मृतदेह दिसला. नागरिकांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस हवालदार कुशल हातीसकर आणि अमोल भोसले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह वर काढण्यासाठी रत्नदुर्ग माउंटेनिअर्सला बोलावले. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे किशोर सावंत, गौतम बाष्टे, शैलेश नार्वेकर, आनंद कीर, ओंकार शिवलकर, अक्षय बोरसूतकर, वीरेंद्र वणजू, साई खेऊर आणि तनिष्क सावंत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रॅपलिंगच्या साह्याने मृतदेह बाहेर काढला. अमोलचा सख्खा भाऊ आशीष याने मृतदेह पाहिल्यानंतर तो अमोलचाच असल्याचे ओळखले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande