
बीड, 10 एप्रिल (हिं.स.) : आष्टी तालुक्यातील एकूण ११ रिक्त जागांसाठी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक गावांमध्ये पारंपरिक गटांमध्ये थेट लढती होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचीही शक्यता आहे.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत १३ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर १७ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
गावागावांत सध्या बैठका, गाठीभेटी आणि प्रचाराला वेग आला असून स्थानिक प्रश्नांवर निवडणूक रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते आणि विकासकामे हे प्रमुख मुद्दे चर्चेत आहेत.
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा, पिंपळगाव घाट, ठोंबळसांगवी, बीडसांगवी, देवीनिमगाव, डोंगरगण, पिंपळा, कडा, सावरगाव घाट, कानडी बु. आणि हिंगणी या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या पोटनिवडणुकांमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis