
कोल्हापूर, 10 एप्रिल (हिं.स.)। कागल येथील राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले. ते म्हणाले परवाच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांना मी शुभेच्छाही दिलेल्या होत्या. अनेक चॅनेल आणि मुलाखतींमध्ये त्यांनी माझे दिलदारपणाने कौतुकही केलेले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून दोघांनी एकमेकांना कवळ्यात घेतल्यानंतरसुद्धा त्यांचा मला फोन आला होता. मी त्यांना सांगणार आहे, मुख्यमंत्र्याबरोबर माझा, त्यांचा आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे असा चौघांचा एका कवळ्यात घेतलेला फोटो काढूया. माजी खासदार संजय मंडलिकही आले तरी त्यांनाही सोबत घेऊन या तालुक्याचा सर्वांगसुंदर विकास करूया.
पी. एम. सूर्यघर मोफत वीज योजना प्रभावीपणे राबवून कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती वीजबिले शून्यावर आणणे हेच माझे स्वप्न आणि हाच माझा ध्यास आहे. त्यासाठी केडीसीसी बँकेच्या माध्यमातून अल्प व्याजदरात अर्थसहाय्यही करणार आहोत. गोकुळ दूध संघाबाबतची सुनावणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात सुरू आहे. त्यामुळे, या विषयावर बोलल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल. त्यामुळे या विषयावर आठ-दहा दिवसांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊनच स्पष्ट बोलू, असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar