कॅम्पस टू कॉर्पोरेट उपक्रमामुळे उद्योगांना ‘जॉब-रेडी’ मनुष्यबळ मिळणार ,निमाचा पुढाकार
नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.)। : उद्योगांना दर्जेदार व तत्परतेने काम करण्यास सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी “कॅम्पस टू कॉर्पोरेट” हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक अभिषेक वर्मा यांनी दिली. यासं
Campus to Corporate initiative


नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.)।

: उद्योगांना दर्जेदार व तत्परतेने काम करण्यास सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी “कॅम्पस टू कॉर्पोरेट” हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक अभिषेक वर्मा यांनी दिली. यासंदर्भात अलीकडेच निमा हाऊस येथे बैठक पार पडली.

एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस मॅक्स, रिलायन्स आदी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये २२ वर्षांचा कॉर्पोरेट अनुभव तसेच १८ वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव असलेल्या वर्मा यांनी उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील दरी कमी करण्याची गरज अधोरेखित केली. सध्या उद्योगांना गुणवत्तापूर्ण आणि ‘जॉब-रेडी’ मनुष्यबळाची कमतरता जाणवत असून, त्यावर उपाय म्हणून “कॅम्पस टू कॉर्पोरेट” हा प्रकल्प विकसित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत महाविद्यालये आणि उद्योग यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यांना प्रगत व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात वास्तविक कामाच्या परिस्थितींचे प्रात्यक्षिक, कॉर्पोरेट संस्कृतीतील १२ महत्त्वाच्या घटकांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्ये, कामातील शिस्त, टीमवर्क आणि कार्यक्षमता वाढ यावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचे सतत मूल्यमापन करण्यात येणार असून यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

या उपक्रमामुळे उद्योगांना ‘रेडी-टू-वर्क’ तसेच भविष्यातील सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, तर विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश करताना आवश्यक कौशल्ये व आत्मविश्वास मिळणार आहे.या प्रकल्पासंदर्भात निमा व संबंधित उद्योग संस्थांबरोबर पुढील काळात सविस्तर चर्चा व सहकार्याची प्रक्रिया सुरू होणार असून, या उपक्रमामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला आणि तरुणांच्या रोजगारक्षमतेला चालना मिळेल, असा विश्वास निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी व्यक्त केला.

बैठकीस निमाचे अध्यक्ष आशिष नहार, सचिव राजेंद्र अहिरे तसेच खजिनदार राजेंद्र वडनेरे, विनस वाणी, हेमंत राख, मिलिंद राजपूत, हेमंत खोंड, संजय राठी, प्रकाश गुंजाळ, वृंदा रावल, गोविंद बोरसे, नानासाहेब देवरे, श्रीकांत पाटील आदी पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande