
रत्नागिरी, 10 एप्रिल, (हिं. स.) : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत गाव पातळीवर कर्करोगाकरिता होणार रुग्ण तपासणी कार्यक्रम सुरू केला आहे.
असंसर्गजन्य आजारांची झपाट्याने वाढ होत असून जवळपास ६३ टक्के मृत्यू असंसर्गजन्य रोगामुळे होतात. त्यापैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ९ टक्के आहे. एका सर्वेक्षणानुसार कर्करोगाचे १३ लक्ष २४ हजार रुग्ण आढळून आले आहेत.राज्याच्या विचार करता मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा मुख कर्करोग हे तीन सर्वांत जास्त आढळणारे कर्करोग आहेत. आजच्या काळातील बदलती जीवनशैली व सवयी यांमुळे कर्करोग रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
वाढत्या कर्करोगाचे प्रमाण कमी करणे व जास्तीत जास्त लोकांची तपासणी करुन त्यांना वेळीच उपचार आणि संदर्भ सेवा देण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे गेल्या ८ एप्रिलपासून ११ मेपर्यंत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन मार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गाव पातळीवर कर्करोगाकरिता मोठ्या प्रमाणावर रुग्ण तपासणी प्राथमिक उपचार व संदर्भ सेवा दिली जाणार आहे. या वाहनामध्ये मुखाचा, स्तनाचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग इत्यादींची तपासणी दंतशल्य चिकित्सक व स्त्रीरोग तज्ज्ञ विशेषज्ञांमार्फत मोफत करण्यात येणार आहे.
या व्हॅनचा प्रवास असा असेल -
दि. ११ एप्रिलपर्यंत संगमेश्वर
दि. १३ एप्रिल ते १६ एप्रिल चिपळूण
दि. १७ एप्रिल ते २० एप्रिल खेड
दि. २१ एप्रिल ते २२ एप्रिल मंडणगड
दि. २३ एप्रिल ते २५ एप्रिल दापोली
दि. २७ एप्रिल ते २९ एप्रिल गुहागर
दि. ३० एप्रिल ते ०४ मे रत्नागिरी
दि. ०५ मे ते ०७ मे लांजा
दि. ०८ मे ते ११ मे राजापूर
जिल्हयातील सर्व ग्रामस्थांनी कॅन्सर व्हॅनमार्फत देण्यात येणाऱ्या सेवासुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेऊन आपली तपासणी करून घ्यावी. अधिक माहितीकरिता जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये भेट देऊन चौकशी करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.कर्करोगविषयक आरोग्य सल्ला मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०४ वर कॉल करून माहिती घ्यावी, असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सूचित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी