
परभणी, 10 एप्रिल (हिं.स.)।
आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी हॉल येथे घेण्यात आले. जनगणना प्रक्रियेसाठी तीन हजारांहून अधिक मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असून, त्यानुसार नियुक्त्या करून प्रशिक्षण सत्रे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नागरिकांनी जनगणना प्रक्रियेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
जनगणना संचालनालय, महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या पहिल्या बॅचचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी अनुराधा ढालकरी, नायब तहसीलदार तथा मास्टर ट्रेनर डॉ. राजकुमार राठोड, नगरसचिव मनपा परभणी तथा मास्टर ट्रेनर विकास रत्नपारखे, सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हा जनगणना लिपीक अलताफ मिया उपस्थित होते.
प्रशिक्षणाचा भाग म्हणून मास्टर ट्रेनर डॉ. राजकुमार राठोड, विकास रत्नपारखे व अलताफ मिया यांनी ३२ क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रत्यक्ष फिल्ड व्हिजिटद्वारे आरआर पेट्रोल पंप परिसरात घरगणनेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्रशिक्षणानंतर क्षेत्रीय प्रशिक्षक तालुका स्तरावर प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. तालुका प्रशिक्षण सत्रे २७ एप्रिल ते ८ मे 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व तालुके, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांसाठी २,७२७ प्रगणक व ४७१ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis