अचलपूरमध्ये सेंट्रल बँकेत कॅश टंचाई; खातेदार त्रस्त
अमरावती, 10 एप्रिल (हिं.स.) : शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अचलपूर शाखेत ६ एप्रिलपासून निर्माण झालेल्या कॅश टंचाईमुळे खातेदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सलग तीन दिवसांपासून बँकेत रोख रक्कम उपलब्ध नसल्याने नागरिकांची महत्त्वाची आर्थिक
सेंट्रल बँकेत ठणठणाट; खातेदार अडचणीत चलन पेटीत पैसाच नाही


अमरावती, 10 एप्रिल (हिं.स.) : शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अचलपूर शाखेत ६ एप्रिलपासून निर्माण झालेल्या कॅश टंचाईमुळे खातेदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सलग तीन दिवसांपासून बँकेत रोख रक्कम उपलब्ध नसल्याने नागरिकांची महत्त्वाची आर्थिक कामे रखडली असून शहरभर नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पेन्शनधारक, शेतकरी, व्यापारी तसेच दैनंदिन व्यवहारांवर अवलंबून असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात या शाखेवर अवलंबून आहेत. मात्र अचानक उद्भवलेल्या या समस्येमुळे अनेकांना पैसे न मिळाल्याने निराश होऊन परत जावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या संयमाची परीक्षा घेतली जात आहे.

अचलपूर शाखेत दररोज शेकडो व्यवहार पार पडतात. विशेषतः महिन्याच्या सुरुवातीला पेन्शन काढणे, शेतीसाठी खर्च करणे आणि व्यापाऱ्यांचे देय-घेय भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रकमेची आवश्यकता असते. परंतु सध्या कॅश उपलब्ध नसल्याने व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामुळे अनेकांची देयके अडकली असून वैद्यकीय, शैक्षणिक आणि इतर तातडीच्या गरजांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान, शहरातील सेंट्रल बँकेच्या एकमेव एटीएममध्येही अनियमितता दिसून येत आहे. कधी कॅश उपलब्ध असते तर कधी पूर्णपणे संपलेली असते. त्यामुळे नागरिकांना वारंवार एटीएमकडे जाऊनही निराश परतावे लागत आहे. काहींनी इतर बँकांच्या एटीएमचा पर्याय निवडला, मात्र व्यवहारांवरील मर्यादेमुळे समस्या पूर्णतः सुटलेली नाही.

शेतकरी गोपाल राजुरकर यांनी आपली व्यथा व्यक्त करताना सांगितले की, “सोमवारी कॅश काढण्यासाठी गेलो असता उद्या या असे सांगण्यात आले. मंगळवारी पुन्हा गेल्यावरही कॅश नव्हती. दोन दिवसांपासून माझे काम अडकले आहे.”

दरम्यान, या समस्येबाबत बँक प्रशासनाकडून अद्याप ठोस स्पष्टीकरण मिळाले नसून, लवकरात लवकर कॅश पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande