
परभणी, 10 एप्रिल (हिं.स.) : साहित्य संमेलन हे साहित्य चळवळीला गती देणारे आणि प्रेरणादायी ठरतात, असे प्रतिपादन जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष तसेच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले.
नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापक कक्षात गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाच्या आढावा बैठकीचे आयोजन उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते.
डॉ. कोठेकर पुढे म्हणाले की, कोणत्याही चांगल्या उपक्रमाचा समारोप नसतो, तर ती नव्या सुरुवातीची नांदी असते. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने अक्षर प्रतिष्ठानतर्फे आयोजित हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी ठरले. यामागे संयोजन समितीचे नियोजनबद्ध आणि संघटित परिश्रम कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सेलूतील साहित्यिक चळवळ अखंडित ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
साहित्य संमेलनामुळे वाचन संस्कृती वाढीस लागते आणि नव्या पिढीला साहित्य क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.संयोजन समितीचे सरचिटणीस प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनीही सांगितले की, जिल्हास्तरीय अक्षर साहित्य संमेलनामुळे सेलूच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात महत्त्वाची भर पडली असून शहराच्या नावलौकिकात वाढ झाली आहे. नवोदित कवी व लेखकांना या माध्यमातून प्रोत्साहन मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.या बैठकीत संमेलनाचा जमाखर्च व लेखापरिक्षित अहवाल अक्षर प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सुरेश हिवाळे यांनी सादर केला. प्रास्ताविक डॉ. शरद ठाकर यांनी केले तर सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. राजाराम झोडगे यांनी केले.या बैठकीस अनेक मान्यवर, मुख्याध्यापक आणि साहित्यिक उपस्थित होते.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis