
बीड, 10 एप्रिल (हिं.स.)।
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-सी वरील धारूर घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांची मालिका खंडित करण्यासाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार धारूर घाटातील ११.२४ किमी अंतराच्या रस्ता रुंदीकरण आणि सुधारणेसाठी सुमारे ३३० कोटी रुपयांचा सविस्तर प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यामध्ये सहा किलोमीटरच्या टप्प्यात चौपदरीकरण तर उर्वरित पाच किलोमीटर भागात १० मीटर रुंदीकरण केले जाणार आहे. प्रवाशांच्या तात्काळ सुरक्षिततेसाठी ५७ लाख रुपयांच्या निधीतून पुढील एका महिन्यात खड्डे भरणे, संरक्षक रेलिंग उभारणे आणि साईड पट्ट्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त माजलगाव-केज मार्गासाठी २७ लाखांची तरतूद करण्यात आली असून सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. यामुळे घाटातील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis