
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या आवारातील झाडाझुडपांत ड्रोन आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले.
सीआयएसएफचे पोलिस निरीक्षक धनंजयकुमार सिंग यांनी तक्रार दिली. विमानतळ परिसरात त्यांचे सहकारी गस्त घालत होते. हेड कॉन्स्टेबल संतोष आव्हाड, नंदकुमार हे वॉच टॉवर ७ जवळ काम करत असताना त्यांना झुडपात ड्रोन पडलेले दिसले.
त्यांनी धनंजयकुमार यांना कळवले. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर ड्रोन तुटलेल्या व काहीसे गंजलेल्या अवस्थेत आढळले. त्यामुळे ते काही दिवसांपूर्वी पडले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चांदीच्या रंगाचे हे ड्रोन पॉवर फोल्डिंग फ्यूजलेज ब्रशलेस कंपनी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विमानतळ परिसरात ड्रोन उडवण्यास पूर्णपणे मनाई असते. असे केल्यास गंभीर गुन्हा दाखल होतो. प्राथमिक निरीक्षणानुसार, विमानतळात आढळलेले ड्रोन हे नॉन जीपीएस ड्रोन आहे. त्यात कुठल्याही प्रकारचे जीपीएस, सिरियल क्रमांक नसतो.
हे चायनीज बनावटीचे व नॉन ते कमर्शियल असून त्याला टॉय ड्रोनही म्हणतात. त्याला हलक्या दर्जाचा कॅमेरा असतो. रेंज अत्यंत कमी असल्याने फार दूर व वरपर्यंतही उडत नाही. त्यामुळे हे जवळूनच उडवले असावे, असे निरीक्षण नोंदवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis