डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावेत – परभणी जिल्हाधिकारी
परभणी, 10 एप्रिल (हिं.स.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. समता कार्यक्रम विविध उपक्रमांनी राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावेत – परभणी जिल्हाधिकारी


परभणी, 10 एप्रिल (हिं.स.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. समता कार्यक्रम विविध उपक्रमांनी राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे थोर विचार प्रत्येकाने आत्मसात करुन जीवनात वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके यांच्यासह नागरिक व पत्रकार उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात व नाविण्यपूर्ण उपक्रमाने साजरी करण्याचे आवाहन करुन जिल्हाधिकारी म्हणाले की, केवळ मिरवणुका आणि औपचारिक कार्यक्रमांपुरती जयंती मर्यादीत न ठेवता डॉ. आंबेडकरांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात यावा. घराघरात डॉ. आंबेडकरांचे विचार रुजवावेत. समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविणे, न्याय हक्कासाठी संघटीतपणे उभे राहणे आणि संविधानिक मार्गाने समाजातील अनिष्ठ परंपरांविरोधात संघर्ष करणे या डॉ. आंबेडकरांच्या विचारांसह समता,बंधुता आणि न्याय ही मूल्ये प्रत्यक्ष जीवनात उतरवावी आणि डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यावर भर देणे, हीच जयंतीनिमित्त त्यांना खरी आदरांजली ठरेल.

यावेळी उपस्थित पत्रकारांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत सन्मानपूर्वक वितरीत करण्यात आली. सर्व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची सविस्तर रुपरेषा

दि. 11 एप्रिल, 2026 रोजी परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने ‘क्रांतीचा साक्षीदार’ हे एकपात्री नाटय आयोजित करण्यात आले आहे. तसेच लाभार्थ्यांना निवडीचे पत्र, जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.

दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वा. संविधान जागर अंतर्गत डॉ. अरुणकुमार लेमाडे यांचे भारतीय संविधानाविषयी व्याख्यान परभणी येथील नालंदा बौध्दविहार, रविराज पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये स्वच्छता अभियान, महिला मेळावा राबविण्यात येणार आहे.

दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. जिल्हा सामान्य रुग्णालयात जेष्ठ नागरिकांचा मेळावा व आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

दि. 14 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 9.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जिल्हा कोषागार कार्यालयाच्या बाजुस शाहीर काशिनाथ उबाळे आणि संच यांचा पोवाडे व भिमगीते व सांस्कृतिक कार्यक्रमाने सप्ताहाचा समारोप होईल. या सर्व कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande