
रायगड, 10 एप्रिल (हिं.स.)। रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) कंपनीकडून मिळालेल्या CSR निधीवरून गोंधळ निर्माण झाला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेल्या माहितीत सुरुवातीला “निरंक” उत्तर देण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
माहितीनुसार, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात आरसीएफकडून सुमारे ₹७४.६९ लाखांचा निधी रुग्णालयाला प्राप्त झाला होता. मात्र, या निधीबाबत सुरुवातीला कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आल्याने संशय निर्माण झाला. यावर रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण देताना, संबंधित निधी कोविड-१९ संदर्भात नसल्यामुळे माहिती देताना गैरसमज झाला आणि “निरंक” उत्तर देण्यात आले, असे नमूद केले आहे. या निधीतून दुरुस्ती कामे व वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी सुमारे ₹७४.४८ लाख खर्च करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
तसेच, २०२२-२३ या कालावधीत आरसीएफमार्फत देणगी स्वरूपात वैद्यकीय उपकरणे देण्यात आली होती. ही उपकरणे प्रत्यक्षात १ एप्रिल २०२३ रोजी प्राप्त झाल्याने त्यापूर्वीच्या नोंदीत त्यांचा उल्लेख नसल्यामुळे “निरंक” उत्तर देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, आरसीएफचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. राकेश कवळे यांनी खुलासा करत, गेल्या काही वर्षांत कोट्यवधींचे योगदान दिल्याचे सांगितले. यात ₹१.३७ कोटींची अत्याधुनिक उपकरणे, औषधांचा पुरवठा, तसेच कोविड काळात ऑक्सिजन प्लांटसाठी मदत यांचा समावेश आहे.
मात्र, एवढ्या मोठ्या निधी व उपकरणांनंतरही सुरुवातीला “निरंक” माहिती देण्यात आल्याने पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)