
जळगाव, 10 एप्रिल (हिं.स.)आखाती देशांमधील युद्धामुळे सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली. मात्र आता युद्ध थांबल्यानंतर जागतिक बाजारात मोठी हालचाल दिसून येत आहे. या घडामोडींचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णपेठेवरही होताना दिसत आहे.काल गुरुवारी जळगाव सराफ बाजारात सोन्यासह चांदी दरात घसरण झाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी आज शुक्रवारी सराफा बाजार उघडताच जळगाव बाजारपेठांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली.जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल १ हजार रुपयांची वाढ होऊन दर १,५५,०१५ रुपये इतका झाला आहे. तर चांदीचा दरही प्रति किलो ५ हजार रुपयांनी वाढून २,५२,३५० रुपये इतका झाला आहे.दरम्यान, लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात झालेली वाढ ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकत असून, खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय परिस्थिती स्थिर राहिली नाही तर सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर