
अमरावती, 10 एप्रिल (हिं.स.) तालुक्यातील आदिवासीबहूल आमझरी गावात ‘मधाचे गाव’ योजनेंतर्गत मधपेट्या व संबंधित साहित्य वाटपासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे होते.
राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयामार्फत राज्यातील सुमारे दहा गावांना ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. विदर्भातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून आमझरी निसर्ग पर्यटन संकुलाची निवड करण्यात आली असून, येथे या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या उपक्रमाअंतर्गत मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या बफर झोनमधील नैसर्गिक मध संकलनावर आधारित स्थानिकांसाठी रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच सातेरी मधमाशींचे ‘मधुबन’ विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मधपेट्या व साहित्य वाटपाबाबत ग्रामपंचायत स्तरावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सातेरी मधमाशी वसाहत संकलनाचा अनुभव असलेला प्रशिक्षक खादी मंडळामार्फत निवासी स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.
गावाच्या पर्यटनवाढीसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये गावाचे सुशोभीकरण, रंगरंगोटी, मध विक्री केंद्र, स्मरणिका (सुव्हेनीर) दुकान, मधमाशी संग्रहालय, सेल्फी पॉइंट, मधुबन, गुलाब गार्डन तसेच ‘आग्या’ मधमाशी संकलन प्रशिक्षण यांचा समावेश आहे. यासाठी संबंधित स्थळांचे निरीक्षणही करण्यात आले.
नैसर्गिक मधाला वाढती मागणी असल्यामुळे ग्रामस्थांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या बैठकीला ग्रामपंचायत सचिव साबूलाल धिकार, मंगल धिकार, स्फूर्ती क्लस्टर संचालक सुनील भालेराव, मनोहर जांभेकर, राजेंद्र तायडे, खादी ग्रामोद्योगचे वरिष्ठ सहायक वानखेडे, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपीलाल धिकार, हेमंत आलोकार, श्रीमती नवले, मानकू साबूलाल तोटे, आमझरी शबरी ग्राम समितीच्या अध्यक्षा सुशीला राजमा मावसकर, सचिव प्रवीण धाजू कासदेकर, तसेच खटकाली येथील शबरी योजनेच्या अध्यक्षा रीना जांभेकर, प्रकाश जांभेकर यांच्यासह ग्रामस्थ आणि विविध समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी