
बीड, 10 एप्रिल (हिं.स.) : अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवरील मानवलोक कार्यालयाजवळ झालेल्या भीषण अपघातात दीनदयाळ बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुदर्शन टाक (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला.
सुदर्शन टाक हे आपल्या दुचाकीवरून बँकेत कामासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. तथागत चौकाजवळील रिंग रोडवर हा अपघात घडला. ट्रक अनियंत्रित असल्याचे सांगण्यात येत असून धडक इतकी भीषण होती की गंभीर दुखापतीमुळे टाक यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) रुग्णालयात पाठवला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अपघातास कारणीभूत ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis