लातूर - पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन मैदानाचे उद्घाटन
लातूर, 10 एप्रिल (हिं.स.)।पोलीस दलाच्या दैनंदिन ताणतणावपूर्ण व जबाबदारीच्या कामकाजातून पोलिसांना मानसिक व शारीरिक दिलासा मिळावा, तसेच त्यांच्या अंगी असलेली खेळाडू वृत्ती जोपासली जावी, या उद्देशाने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात नव्याने उभारण्या
पोलीस


लातूर, 10 एप्रिल (हिं.स.)।पोलीस दलाच्या दैनंदिन ताणतणावपूर्ण व जबाबदारीच्या कामकाजातून पोलिसांना मानसिक व शारीरिक दिलासा मिळावा, तसेच त्यांच्या अंगी असलेली खेळाडू वृत्ती जोपासली जावी, या उद्देशाने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात नव्याने उभारण्यात आलेल्या हॉलीबॉल आणि बॅडमिंटन मैदानाचे उद्घाटन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

उद्घाटनानंतर पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासोबत प्रत्यक्ष हॉलीबॉल खेळून खेळाडूंचा उत्साह वाढविला.

या वेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत करून पोलीस दलातील आरोग्यदायी उपक्रमांना चालना मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या दूरदृष्टीतून व संकल्पनेतून या हॉलीबॉल आणि बॅडमिंटन मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस दलामध्ये सतत चालणाऱ्या धावपळीच्या व तणावपूर्ण कामामुळे अनेकदा शारीरिक व मानसिक थकवा जाणवतो. या पार्श्वभूमीवर पोलिसांना त्यांच्या मोकळ्या वेळेत खेळाची संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज ओळखून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

सदर मैदानामुळे पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या कामकाजानंतर उपलब्ध वेळेत नियमितपणे हॉलीबॉल आणि बॅडमिंटन खेळता येणार असून, त्यातून त्यांचे शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार आहे. खेळामुळे मानसिक ताणतणाव कमी होऊन कार्यक्षमता वाढण्यासही मदत होत असल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या मैदानाच्या निर्मितीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर तसेच पोलीस अंमलदार रामलिंग शिंदे यांनी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या योगदानाचे कार्यक्रमादरम्यान विशेष कौतुक करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले की, “पोलिसांचे काम हे अत्यंत जबाबदारीचे व तणावपूर्ण असते. अशा परिस्थितीत शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी क्रीडा उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. अशा प्रकारचे उपक्रम पोलीस दलामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात व कार्यक्षमता वाढवितात.” त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारचे क्रीडा व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande