
नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.)।
कुंभमेळ्याच्या कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. नगरसेवक आणि ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला जाणार असून कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणीही कामात अडथळा आणत असल्यास पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मंत्री महाजन यांनी शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषदेत अनेक गंभीर मुद्द्यांवर भाष्य करत भूमिका स्पष्ट केली.
नाशिकमध्ये सध्या अत्यंत घृणास्पद प्रकार घडत असल्याचे सांगत महाजन यांनी संताप व्यक्त केला. एका मोठ्या कंपनीत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. कोणताही दोषी सुटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
नोकरीचे आमिष दाखवून महिलांचे तसेच काही मुलांचेही धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पीडित महिलांनी पुढे येण्याचे आवाहन करत त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि शासन त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच कंपन्यांमधील विशाखा समित्या सक्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले असून महिलांनी तक्रारी करण्यासाठी पुढे यावेया संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरू असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे याकडे बारकाईने लक्ष आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
वृक्षतोडीच्या मुद्द्यावर बोलताना महाजन म्हणाले की, शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे आणि अपघातांच्या घटनांमुळे काही झाडे काढावी लागत आहेत. मात्र त्याऐवजी मोठ्या प्रमाणावर नवीन झाडे लावली जात असून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. पर्यावरणप्रेमींनीही शहराच्या हिताचा विचार करून निर्णय समजून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
टायगर ऑपरेशनबाबत तसेच मुंबईतील नगरसेवक निधीबाबतही आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.एकूणच, नाशिकमधील कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, विकासकामे आणि पर्यावरण या सर्वच मुद्द्यांवर प्रशासन सतर्क असून आगामी बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
टीसीएस संदर्भातील प्रकरण अत्यंत चुकीचे
टीसीएस संदर्भातील प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी इतर कंपन्यांमध्येही अशा प्रकारांची तपासणी होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. मुलींना ब्लॅकमेल करण्याच्या घटना समोर येत असून शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. काही विशेष पथके यासाठी तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV