
लॉयड्स फाउंडेशनकडून मिळाली ५ लाखांची मदत
गडचिरोली, 10 एप्रिल (हिं.स.) : देशातील कोठडीतील लैंगिक अत्याचार कायद्यात (Custodial Rape Laws) ऐतिहासिक बदल घडवून आणणाऱ्या प्रसिद्ध “मथुरा” प्रकरणातील पीडिता आज ७२ व्या वर्षी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याचे समोर आले आहे. ज्या प्रकरणामुळे भारताच्या न्यायव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या, त्या मथुरा मात्र आज मूलभूत गरजांपासून वंचित अवस्थेत असल्याचे चित्र आहे.
मथुरा सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात एका मोडकळीस आलेल्या झोपडीत राहत असून त्यांना पक्षाघाताचा त्रास आहे. अन्न, आरोग्यसेवा आणि सुरक्षित निवारा यांचा मोठा अभाव असल्याने त्यांची अवस्था अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने (LIF) सामाजिक उत्तरदायित्वातून पुढाकार घेत मथुरा यांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत सुरक्षित घर बांधणे आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाणार आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश गुप्ता यांनी ही मदत जाहीर केली असून, संस्थेने प्रधानमंत्री आवास योजनेशी (PMAY) जोडण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मथुरा यांना कायमस्वरूपी निवाऱ्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
या संदर्भात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी सांगितले की, “मथुरा यांची कहाणी समाजासाठी महत्त्वाची ठरली असली तरी त्यांना योग्य सन्मान मिळालेला नाही. त्यांना प्रतिष्ठा आणि सुरक्षित जीवन मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे.”
लॉयड्स समूहाच्या या पुढाकारामुळे ऐतिहासिक योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मान देण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडल्याचे मानले जात आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond