
लातूर, 10 एप्रिल (हिं.स.)
एस आर पी एफ गटासाठी लातूरचा प्रस्ताव, कासार शिरशी पोलीस स्टेशन दर्जोन्नतीचा मुद्दा, बेलकुंड येथे नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव या बाबींवर चर्चा
महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची आमदार अभिमन्यू पवार यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत लातूरसह परिसरातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांवर विशेष भर देण्यात आला असून, संबंधित विषयांवर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी आमदार पवार यांनी पाठपुरावा करत सकारात्मक भूमिका मांडली.
लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेड या चार जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून लातूर येथे राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट स्थापन करण्याची मागणी यावेळी अधोरेखित करण्यात आली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्वी भेट घेऊन मागणी करण्यात आली होती.
त्यांनी या प्रस्तावास
सकारात्मक प्रतिसाद देत गृह विभागाला पुढील मंजुरी प्रक्रियेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय निलंगा तालुक्यातील कासार शिरशी पोलीस ठाण्याचे दर्जीनतीकरण करणे तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सहा गावांना अंतरामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी त्यांना
पुन्हा निलंगा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणीही मांडण्यात आली. औसा तालुक्यातील बेलकुंड येथील नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेता तेथे नवीन पोलीस ठाणे मंजूर करण्याचा प्रस्तावही आमदार पवार यांनी यावेळी मांडला. या सर्व मागण्यांवर पोलीस महासंचालक
सदानंद दाते यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रस्तावांवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमुळे लातूर जिल्ह्यातील पोलीस सुविधा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis