
खोट्या शिक्षण संख्यांवर कारवाईची शक्यता
अमरावती, 10 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांची खरी संख्या पडताळण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष अभियान सुरू केले आहे. शनिवार, ११ एप्रिलपासून या पटपडताळणी मोहिमेचा पहिला टप्पा सुरू होत असून, शाळांच्या पटावरील खोट्या विद्यार्थी संख्येचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ही पटपडताळणी तीन टप्प्यांत करण्यात येणार असून, पहिला टप्पा ११ एप्रिलला पार पडणार आहे. त्यानंतर उर्वरित शाळांची पडताळणी १५ आणि २२ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण २,८७१ शाळा असून, त्यामध्ये सुमारे ४ लाख ८३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासाठी ६ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत.
या मोहिमेसाठी शाळांना तीन गटांत विभागण्यात आले आहे. ११ एप्रिल रोजी सुमारे ९५० शाळांची पडताळणी करण्याचे नियोजन आहे. शिक्षणाधिकारी (EO) यांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) कर्मचारी यांचा या प्रक्रियेत सहभाग असेल.
दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना या पडताळणी प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आधार मानून पडताळणी केली जाणार आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने ‘स्टुडंट्स पोर्टल’द्वारे पार पडणार असून, अधिकारी शाळेत जाऊन हजेरीपटानुसार विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासणार आहेत.
या मोहिमेमुळे शिक्षक व मुख्याध्यापकांमध्ये दक्षता वाढली असून, कोणताही विद्यार्थी गैरहजर राहू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी विशेष परीक्षांचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी