
पुणे, 10 एप्रिल, (हिं.स.)। सांगवी-बोपोडीदरम्यान मुळा नदीवर पुलाचे सुशोभीकरण करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २१ कोटी ८७ लाख रुपये खर्च झाले आहेत. महापालिका आर्थिक संकटात असताना सुशोभीकरणावर इतका खर्च का? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
पिंपरी चिंचवड व पुणे महापालिकेने केलेल्या मुळा नदीवरील पुलामुळे जुनी व नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, बोपोडी, खडकी रेंजहिल्स, भोसलेनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढली. पुलाचे सुशोभीकरण, विद्युत रोषणाई, सौंदर्यीकरण महापालिकेने केले आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंनी लोखंडी कमान उभारून रोषणाई करण्यात आली. याचे उद्घाटन आणि पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ असे नामकरण महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते झाले. मात्र, पुलाच्या कामाचा खर्च सुमारे ३२ कोटी रुपये आणि सौंदर्यीकरणाचा खर्च सुमारे २१ कोटी ८७ लाख रुपये झाला आहे. त्यामुळे सुशोभीकरणावर इतका खर्च करण्याची गरज होती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु