
पुणे, 10 एप्रिल (हिं.स.)। पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा ड्रीम प्रोजेक्ट ठरलेली पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा’ अखेर प्रत्यक्षात साकारत असून, येत्या ११ एप्रिल रोजी या शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. जिल्हा परिषदेची ही पहिली इंग्रजी माध्यमाची आणि केंद्रीय बोर्डावर आधारित ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा ठरणार आहे.
या शाळेच्या उद्घाटनाची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत वाघमारे, आदी उपस्थित होते. महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९व्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या २००व्या जयंती वर्षाच्या प्रारंभदिनी हा सोहळा पार पडणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.
या शाळेत बालवाडी ते इयत्ता बारावीपर्यंत सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. डिजिटल शिक्षणपद्धती, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक ग्रंथालय, क्रीडा सुविधा यांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी खानवडी येथे सुमारे १२ एकर गायरान जमीन राज्य सरकारने जिल्हा परिषदेला वर्ग केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु