
परभणी, 10 एप्रिल (हिं.स.)।
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समता सप्ताहाचे नियोजन करण्यात आले असून विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा फुले पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सायंकाळी 5 वाजता नाट्य सादरीकरण होणार आहे. तसेच दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी ‘संविधान जागर – भारतीय संविधान’ या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सायंकाळी 4 वाजता बी. रघुनाथ सभागृह येथे होणार आहे. यासोबतच वैद्यकीय आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने प्रभाग समिती ‘ब’ कार्यालय येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून मिरवणुकीच्या मार्गांवरील स्वच्छतेवरही विशेष भर दिला जाणार आहे. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, सभागृहनेते समी उर्फ माजुलाला व उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis