
परभणी, 10 एप्रिल (हिं.स.)।
परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील काही भागांत स्वच्छ पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून प्राप्त होताच मनपाने तात्काळ दखल घेत कारवाई केली आहे.
या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभाग प्रमुख तनवीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता बालाजी सोनुले, हेमंत दापटीकर, उपअभियंता शेख इस्माईल, सहाय्यक अभियंता अभिजीत कुलकर्णी, सुधाकरराव देशमुख व बाळासाहेब जगताप यांच्या पथकाने संबंधित भागांची पाहणी केली. पथकाने गोकुळ नगर, मथुरा नगर व यशवंत नगर परिसरातील विविध घरांमधून पाणी नमुने गोळा करून ते जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. काही नमुन्यांची प्राथमिक तपासणी घटनास्थळीच करण्यात आली. प्राथमिक तपासणीत पाण्यातील ओटी (ऑक्सिजन ट्रान्सफर/ट्रीटमेंट इंडिकेटर)चे प्रमाण समाधानकारक असल्याचे आढळून आले. यावेळी संबंधित नगरसेवकांसोबत चर्चा करून त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. मनपाच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळात पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis