
लातूर, 10 एप्रिल (हिं.स.)।जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या निलंगा पंचायत समितीमध्ये असलेल्या बांधकाम विभागाच्या वरिष्ठ सहायक, जि.प. उपविभाग कार्यालय निलंगा यांनी माहिती अधिकाराचे उल्लंघन केले असल्यामुळे त्यांच्याकडुन पाच हजार रुपयांचा दंड वसुल करण्याचे प्रकाश इंदलकर राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी जिल्हा परिषद लातुर येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
जवळपास तीन वर्षांपूर्वी औराद शहाजानी, ता. निलंगा जि. लातूर येथील अमोल ढोरसिंगे यांनी निलंगा पंचायत समितीच्या बांधकाम विभाग यांच्याकडे माहिती अधिकार अंतर्गत एका तक्रार अर्जाविषयी माहीती मागितली होती पण तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा वरिष्ठ सहायक असलेले पठाण यांनी मुदतीत कोणताही प्रतिसाद व माहिती दिली नसल्यामुळे त्याच कार्यालयात उपअभियंता यांचेकडे प्रथम अपिल दाखल केले.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे तत्कालीन उप अभियंता असलेले श्रीनिवास गंगथडे यांनीही व्दितीय अपिलावर सुनावणी न घेतल्यामुळे अमोल ढोरसिंगे यांनी राज्य माहिती आयोग यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केले व द्वितीय अपिल दाखल केल्यानंतर राज्य माहिती आयोगाने दोन वर्षांपूर्वीच संबंधित जन माहिती अधिकारी यांना ३० दिवसांमध्ये तात्काळ माहिती पुरविण्याचे आदेश देण्यात आले होते तसेच प्रथम अपीलीय अधिकारी तथा उप अभियंता बांधकाम विभाग यांनी राज्य माहिती आयोगाचे कलम १९ (६) चा भंग केल्यामुळे त्यांच्यावर संबंधित २००८ च्या परिपत्रकानुसार शिस्तभंगाच्या कारवाईचा आदेश प्रास्तावित करण्याचे आदेश करण्यात आले होते पण तरीही माहिती मिळाली नसल्यामुळे अपिलार्थी अमोल ढोरसिंगे यांनी कलम १८ नुसार तक्रारी
अर्ज पुन्हा राज्य माहिती आयोगाकडे दाखल केला व कोणतीही कार्यवाही संबंधित बांधकाम विभाग जिल्हा परिषद लातूर करीत नाही असे कळविले होते त्यामुळे प्रकाश इंदलकर राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर नगर येथील आयुक्त यांनी दिनांक ०४/०९/२०२५ रोजी आदेश देत त्याची प्रत दिनांक २५/११/२०२५ रोजी काढली आणि तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा वरीष्ठ सहाय्यक माहीती अधिकार अधिनियम कलम ७ (१) चा भंग झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अधिनियमातील कलम १९ (८) (ग) २००५ च्या तरतुदीनसार कार्यवाही करत शिक्षेस पात्र ठरत असल्यामुळे त्यांना ५०००/- (अक्षरी पाच हजार रुपये) इतकी शास्ती अंतिम करण्याचा निर्णय आयोग घेतला आहे आणि याची वसुली ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांचेवर सोपविण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis