पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर उपक्रमांतर्गत तत्पर कारवाई; पाईपलाईन वाद शांततेत मिटवला
लातूर, 10 एप्रिल (हिं.स.)। मौजे होसुर परिसरात दोन शेतकऱ्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याच्या कारणावरून निर्माण झालेला वाद औराद पोलीस स्टेशनच्या तात्काळ व समंजस हस्तक्षेपामुळे शांततेत मिटविण्यात आला असून, दोन्ही पक्षांनी समाधान व्यक्त केले
पोलीस


लातूर, 10 एप्रिल (हिं.स.)।

मौजे होसुर परिसरात दोन शेतकऱ्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याच्या कारणावरून निर्माण झालेला वाद औराद पोलीस स्टेशनच्या तात्काळ व समंजस हस्तक्षेपामुळे शांततेत मिटविण्यात आला असून, दोन्ही पक्षांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर राबविण्यात येत असलेल्या “पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर” या लोकाभिमुख उपक्रमाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौजे होसुर येथील दोन शेतकऱ्यांमध्ये मौजे बोटकुळ येथील तळ्यातून आपल्या शेतासाठी पाणीपुरवठा करण्याकरिता पाईपलाईन रीतसर शासकीय परवानगी सह शेतातून नेण्याचा कारणावरून मागील सुमारे एक महिन्यापासून गावपातळीवर वाद सुरू होता व ग्रामस्थांच्या विरोधामुळे हे काम प्रलंबित ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज रोजी पाईपलाईनचे काम पुन्हा सुरू करण्यात आले असता शेतकऱ्यांमध्ये वाद तीव्र होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

घटनेची माहिती मिळताच औराद पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत बांगर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत संयमाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत, त्यांना कायदेशीर बाबींची जाणीव करून दिली व समजूत काढत वाद शांततेच्या मार्गाने मिटविण्यात यश मिळवले.

“पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर” या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, वादांचे वेळेत निवारण करणे व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा आहे. सदर घटनेतही या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी दिसून आली.

पोलीसांच्या या तत्पर व संवेदनशील कारवाईमुळे संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न टळला असून, दोन्ही शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत परस्पर सहमतीने प्रश्न सोडविण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande