
जळगाव, 10 एप्रिल (हिं.स.) | जिल्ह्यात रब्बी हंगामाची पिके ८० टक्क्यांपर्यंत पदरात पडल्यानंतर आता शेतकऱ्यांनी आपला मोर्चा आगामी खरीप हंगामाकडे वळवला आहे. एलनिनोच्या संभाव्य संकटामुळे हवामानाबाबत साशंकता असली, तरी कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ७ लाख ५० हजार हेक्टरपर्यंत खरीप लागवडीचा आराखडा तयार केला आहे.
मात्र, यंदा जळगावचा शेतकरी पुन्हा ‘पांढऱ्या सोन्या’कडे (कापूस) वळणार की मका-कडधान्याला पसंती देणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे गेल्या वर्षी जिल्ह्यात कापूस पिकाला बोंडअळीचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी आणि मजुरांची टंचाई अशा विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. याशिवाय कापसाला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने अनेक शेतकरी या पिकापासून काहीसे दूर गेले असल्याचे चित्र होते. त्यामुळे काही भागांत मका व इतर कडधान्यांच्या लागवडीकडे कल वाढल्याचेही दिसून आले होते. आता हंगामाच्या शेवटी कापसाच्या भावात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. वाढलेल्या दरामुळे कापसाचा पेरा पुन्हा गेल्या वर्षासारखाच (सुमारे ४ लाख हेक्टर) राहण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात कापसाखालोखाल मका पिकाचे महत्त्व वाढत आहे. यंदाही मक्याचे क्षेत्र दीड लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. याशिवाय तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबियांच्या क्षेत्रासाठीही विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी विविध कंपन्यांच्या सुमारे २२ लाख बियाणे पाकिटांची मागणी नोंदवण्यात आली आहे. सध्या शेतात रब्बीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ग्रामीण भागात अक्षय तृतीयेनंतर शेतकरी खरिपाच्या मशागतीला सुरुवात करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर