रायगड - १४०० कोटींच्या योजनेनंतरही टँकरवर अवलंबून
रायगड, 10 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी अलिबाग, पेण, महाड आणि कर्जत या चार तालुक्यांमध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या भाग
Raigad dependent on tankers even after Rs 1400 crore scheme


रायगड, 10 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी अलिबाग, पेण, महाड आणि कर्जत या चार तालुक्यांमध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील १२ गावे आणि ६० वाड्यांतील सुमारे २८ हजार नागरिकांना सध्या १५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

मात्र, हा पुरवठा अपुरा ठरत असल्याने अनेक नागरिकांना दररोज दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी खासगी टँकरकडून पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गेल्या तीन आठवड्यांत टंचाईग्रस्त गावांमध्ये ५५ ने वाढ झाल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे.

रायगड जिल्ह्यात दरवर्षी भरपूर पाऊस पडत असतानाही योग्य जलव्यवस्थापनाचा अभाव असल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येते. नद्यांवर पुरेशी धरणे नसल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर समुद्रात वाहून जाते. परिणामी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते.

टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असला तरी तो दीर्घकालीन उपाय नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात तब्बल १४०० कोटी रुपयांची जलजीवन मिशन योजना राबवूनही प्रत्यक्षात टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने ही स्थिती शोकांतिका ठरत आहे.

दरम्यान, वाढत्या टंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande