
जळगाव , 10 एप्रिल (हिं.स.)आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाने आपली कंबर कसली असून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी खडसे फार्म, मुक्ताईनगर येथे एका महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मतदार यादी नियोजन आणि प्रत्येक बूथ स्तरावर BLO (बी.एल.ओ.) नेमणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे उपस्थित होते. त्यांच्यासोबतच जिल्हा निरीक्षक मा. भास्कर काळे, जिल्हाध्यक्ष मा. प्रमोद नाना पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष यू. डी. पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीला आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘मतदार यादी एस.आय.आर. (SIR) मॅपिंग’ या विषयावर सादरीकरण करण्यात आले. निवडणूक काळात प्रत्येक बूथवर सूक्ष्म नियोजन करण्यासाठी आणि मतदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सक्षम BLO (बी.एल.ओ.) नेमणुकीवर विशेष भर देण्यात आला. तसेच, पक्ष संघटना अधिक गतिमान करण्यासाठी विविध स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले व त्यांना त्यांच्या नवीन जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये बोदवड तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील (आबा) पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, माजी सभापती निवृत्ती पाटील भाऊराव पाटील सर, माजी जि.प. सदस्य रामदास भाऊ पाटील यांसह तालुक्यातील अन्य प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत सहभाग नोंदवला. बैठकीच्या शेवटी, उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी शरदचंद्र पवार साहेबांचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवून देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर