
रत्नागिरी, 10 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने आता कंबर कसली आहे. ही मोहीम केवळ प्रशासकीय नसून ती शहरहिताची एक सामाजिक चळवळ आहे. रत्नागिरीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांनी सांगितले.
शहरात प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने व्यापारी महासंघासोबत बैठक घेतली. यामध्ये नगरपालिकेच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहर स्वच्छतेच्या या लढाईत सहभागी होण्याची ग्वाही दिली.
रत्नागिरीत झालेल्या या बैठकीच्या सुरवातीला नगरपालिकेतर्फे व्यापाऱ्यांना प्लास्टिकबंदीच्या तांत्रिक बाबी समजावून सांगण्यासाठी एक सविस्तर प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. यामध्ये पर्यावरणासाठी घातक ठरणारे प्लास्टिक आणि शासनाने बंदी घातलेल्या वस्तूंची सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीत व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांच्या वैधतेबाबत आणि उपलब्ध पर्यायांबाबत काही तांत्रिक शंका उपस्थित केल्या. बाजारात कोणत्या पिशव्या नियमानुसार वापरता येतील, याबाबत व्यापाऱ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी नगरपालिकेतर्फे लवकरच 'नमुना पिशव्यांसह' आणखी एक विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून योग्य पर्यायांची निवड करणे सोपे होईल.
मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकबाबत कठोर भूमिका जाहीर केली. अतिशय हलक्या आणि कमी दर्जाच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर तत्काळ बंदी घालण्यात आली आहे. अशा पिशव्यांची विक्री किंवा वापर करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निकृष्ट प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी