नवी मुंबईत घुमले सायरन; हवाई हल्ला आणि 'ब्लॅक आऊट'चे थरारक प्रात्यक्षिक
ठाणे, 10 एप्रिल (हिं.स.)। हवाई हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा आणि समाजाचा बचाव कसा करावा, याचे प्रत्यक्ष दर्शन देणारे थरारक ''हवाई हल्ला आणि ब्लॅक आऊट मॉकड्रिल'' गुरुवारी, दि.९ एप्रिल २०२६ रोजी कोपरखैरणे, नवीमुंबई येथे पार पडले.
ठाणे


ठाणे, 10 एप्रिल (हिं.स.)। हवाई हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा आणि समाजाचा बचाव कसा करावा, याचे प्रत्यक्ष दर्शन देणारे थरारक 'हवाई हल्ला आणि ब्लॅक आऊट मॉकड्रिल' गुरुवारी, दि.९ एप्रिल २०२६ रोजी कोपरखैरणे, नवीमुंबई येथे पार पडले.

नवी दिल्ली महासंचालक आणि महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार, नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स), नवी मुंबई समूह, ठाणे कार्यालयामार्फत या प्रात्यक्षिक सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

कोपरखैरणे, सेक्टर-११, नवीमुंबई येथील माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदानावर दुपारी ४.५५ वाजता या प्रात्यक्षिक सरावाला सुरुवात झाली. नागरी संरक्षण विभागाचे उपनियंत्रक विजय जाधव यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हे मॉकड्रिल घेण्यात आले.

यावेळी नागरी संरक्षण ठाणे जिल्ह्याचे मुख्य क्षेत्ररक्षक तथा आमदार संजय केळकर आणि स्थानिक नगरसेविका श्रीमती भारती पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी हवाई हल्ल्यावेळी करायची कार्यवाही, जखमींवर प्रथमोपचार, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कवायती, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका (विमोचन) आणि उंच इमारतींवरून केले जाणारे 'हायराईज रेस्क्यू' याचे अत्यंत शिस्तबद्ध प्रात्यक्षिक सादर केले.

या मॉक ड्रिलमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी (१५४) आणि होमगार्ड जवान (५०), नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि आरोग्य विभागाची रुग्णवाहिका पथक, कोपरखैरणे, वाशी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेचे अग्निशमन दल (वाहनांसह), पोलीस बीडीडीएस (BDS) टीम आणि स्थानिक पोलीस प्रशासन, टी.डी.आर.एफ. (TDRF) टीम, आपत्ती व्यवस्थापन विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, पी.एम.श्री स्कूलचे १ हजार ८३५ विद्यार्थी व कर्मचारी आणि सुमारे २ हजार ५०० स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते.

मुख्य प्रात्यक्षिकापूर्वी ठाकुर्ली येथील मातृबेन काशीबाई पटेल कॉलेजच्या स्वयंसेवकांनी उत्कृष्ट पथनाट्य सादर केले. नागरी संरक्षणाचे प्रशिक्षण कुठे, कसे आणि का घ्यावे, याचे महत्त्व या नाट्यातून पटवून देण्यात आले. संध्याकाळी ७ वाजता 'ब्लॅक आऊट' (दिवे बंद करणे/ प्रकाश बंदी) मोहिमेचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी परिसरातील तुलशी दर्शन सोसायटी (A आणि B विंग) व परिसरात यशस्वीरित्या ब्लॅक आऊट करून युद्धासारख्या परिस्थितीत अंधाराचा वापर करून शत्रूची दिशाभूल कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

मुख्य क्षेत्ररक्षक तथा आमदार संजय केळकर यांनी सर्व सहभागी टीमचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या सरावामुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.

या मॉकड्रील यशस्वीततेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग, नवी मुंबई महानगरपालिका यांचे अनमोल सहकार्य लाभले.

उपनियंत्रक विजय जाधव यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात चारही उपमुख्य क्षेत्ररक्षक, १५ विभागीय क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या उपविभागीय क्षेञरक्षक पथकांनी मोलाचे योगदान दिले. 'वंदे मातरम'ने या मॉक ड्रिलची सांगता झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande