रायगडमध्ये विशेष अभियान; जात वैधता प्रक्रियेला गती
रायगड, 10 एप्रिल (हिं.स.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या “सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” अंतर्गत रायगड जिल्ह्यात १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाब
samta


रायगड, 10 एप्रिल (हिं.स.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या “सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” अंतर्गत रायगड जिल्ह्यात १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड जयंत चाचरकर यांनी दिली.

या मोहिमेचा मुख्य उद्देश मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे हा आहे. विशेषतः इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणारे तसेच अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थी आणि पुढील उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा जात वैधता प्रमाणपत्राच्या विलंबामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी, प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होते.

ही समस्या टाळण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी तातडीने संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत पण अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे व त्रुटींची पूर्तता करावी.

या विशेष मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande