
अमरावती, 10 एप्रिल (हिं.स.) : अमरावती मतदारसंघातील मतदार नोंदणी आणि ‘एसआयआर’ मॅपिंग प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी गुरुवारी तहसील कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापौर श्रीचंद तेजवानी यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी महापौर तेजवानी यांनी सर्व नगरसेवक आणि बीएलओ सुपरवायझर यांना मतदारांच्या समस्या तत्काळ सोडवून मॅपिंग प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
महाराष्ट्रात अद्याप मुख्य ‘एसआयआर’ प्रोग्राम सुरू झालेला नसून सध्या केवळ प्री-मॅपिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रक्रिया शांततेत पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
प्रभागांमध्ये मॅपिंगची टक्केवारी कमी असलेल्या भागांमध्ये लोकप्रतिनिधी आणि सुपरवायझर यांनी अधिक सक्रिय भूमिका घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मॅपिंगच्या कामाला गती देण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
मतदारांनी आपल्या भागातील बीएलओशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी