
लातूर, 10 एप्रिल (हिं.स.) : देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात उन्हाळ्याची चाहूल लागताच घरगुती वाळवण पदार्थांच्या तयारीला महिलांनी मोठ्या उत्साहात सुरुवात केली आहे. बाजारात रेडिमेड कुरड्या, पापड, शेवया आणि चिप्स सहज उपलब्ध असले तरी त्याच्या चवी आणि पौष्टिकतेमुळे ग्रामीण भागात घरगुती पदार्थांनाच अधिक पसंती दिली जात आहे.
गावातील अंगणात सकाळपासूनच महिलांची कुरड्या, पापड आणि इतर वाळवण पदार्थ वाळवण्याची लगबग सुरू असते. भाताच्या पिठाच्या कुरड्या, तांदूळ पापड, मसाला पापड, साळीच्या शेवया तसेच तांदूळ-मसाला चिप्स आणि बटाट्याचे चिप्स असे विविध पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहेत. हे पदार्थ नैसर्गिक पद्धतीने बनवल्यामुळे त्यांना शुद्धता, टिकाऊपणा आणि खास घरगुती चव मिळते, असे महिलांचे म्हणणे आहे.
स्थानिक महिलांच्या मते, बाजारातील रेडिमेड पदार्थांमध्ये कृत्रिम मसाले, सोडा आणि प्रिझर्व्हेटिव्हचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, ज्यामुळे ते आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे मुलाबाळांच्या आरोग्याचा विचार करून ग्रामीण महिला घरगुती पदार्थांनाच प्राधान्य देत आहेत.
उन्हाळ्याच्या या दिवसांत अनेक घरांमध्ये महिलांचा एकत्रित सहभाग पाहायला मिळतो. सकाळपासून दुपारपर्यंत चालणाऱ्या या कामात गप्पाटप्पा, सहकार्य आणि आनंदाचे वातावरण असते. या परंपरेमुळे केवळ आर्थिक बचतच नव्हे तर गावातील सामाजिक एकोपाही अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते.
आधुनिक काळात रेडिमेड पदार्थांचा वापर वाढत असला तरी वलांडी परिसरातील महिलांनी जपलेली ही पारंपरिक वाळवण संस्कृती आजही तितक्याच उत्साहाने टिकून आहे. उन्हाळ्यातील ही खास घरगुती चव गावकऱ्यांच्या घराघरात मेजवानीचा अविभाज्य भाग बनली आहे.-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis