
अमरावती, 10 एप्रिल (हिं.स.) : महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी वडाळी उद्यानाच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना आधुनिक सुविधा व आकर्षक पर्यटनस्थळ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वडाळी उद्यानात राबविण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात विविध आकर्षक व उपयुक्त घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हिस्ट्री गार्डन, फूड कोर्ट एरिया, फ्लॉवर गार्डन, ग्रीन जिम, कॉनटूर लॉन, सायकलिंग ट्रॅक, फाउंटेन, चिल्ड्रन प्ले एरिया तसेच साहसी उपक्रमांसाठी विशेष जागेचा समावेश आहे.
तसेच नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग व्यवस्था, ‘वाइल्ड अ ग्लो’ गार्डन, मेझ गार्डन, जिने (स्टेअरकेस), दिव्यांगांसाठी रॅम्प आणि सुंदर तलाव विकसित करण्यात येत आहे. या सुविधांमुळे वडाळी उद्यान शहरातील प्रमुख आकर्षण ठरणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
महापौर तेजवानी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार पद्धतीने वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नागरिकांसाठी अधिक हिरवळ, आरोग्यदायी वातावरण आणि उत्तम विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यात सभागृह नेते चेतन गावंडे, नगरसेविका ममता आवारे, पंचफुला चव्हाण, नगरसेवक विक्की उर्फ विशाल वानखडे, सैय्यद राशद अली, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, अभियंता राजेश आगरकर, माजी महापौर अशोक डोंगरे तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी