
अमरावती, 10 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यातील तब्बल ११३ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे पाणी नमुना तपासणीत उघड झाले आहे. गेल्या वर्षभरापासून गावकऱ्यांना अशुद्ध पाणी मिळत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पाणी व स्वच्छता विभागाने मार्च महिन्यात जिल्ह्यातील १५३२ गावांमधून पाण्याचे नमुने तपासले. यामध्ये विहीर, हातपंप, शाळा, अंगणवाडी तसेच मुख्य पाणीपुरवठा स्रोतांमधून एकूण १५ हजार ८६१ नमुने घेण्यात आले होते. तपासणीनंतर ११३ गावांतील १८५ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यात एकूण १५८८ गावे असून, एवढ्या मोठ्या प्रमाणावर दूषित पाणीपुरवठा होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणी व स्वच्छता विभागाने तातडीने उपाययोजना केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली असता ९२ गावांतील १४२ नमुने पिण्यायोग्य आढळले. मात्र अद्याप २१ गावांतील नमुने पुनर्तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
या प्रभावित गावांमध्ये अचलपूर, चांदूरबाजार, चिखलदरा, दर्यापूर, धारणी, नांदगाव खंडेश्वर आणि तिवसा तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. उन्हाळ्यामुळे अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, नैसर्गिक स्रोत आटल्याने कृत्रिम पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तालुकानिहाय दूषित पाणीपुरवठा झालेल्या गावे :-
अचलपूर – ११, अमरावती – १३, भातकुली – २०, चांदूरबाजार – ६, चांदूर रेल्वे – ५, चिखलदरा – ८, दर्यापूर – ६, धामणगाव रेल्वे – २, धारणी – ५, मोर्शी – १४, नांदगाव खंडेश्वर – ४, तिवसा – १०, वरुड – ९.
प्रशासनाने काही गावांमध्ये सुधारणा केल्याचा दावा केला असला तरी उर्वरित गावांतील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. नागरिकांनी स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी