
पुणे, 10 एप्रिल (हिं.स.)। केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात सुरू केलेल्या मतदार यादी सखोल पुनर्नरीक्षण ( एस आय आर) मोहिमेने वेग पकडला आहे. वडगाव शेरी मतदार संघातील तब्बल एक लाख 26 हजार मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदारांनी लवकरात लवकर या मोहिमेत सहभाग घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मतदार नोंदणी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी मतदार संघात पाच लाख 24 हजार इतके मतदार आहेत. त्यातील एक लाख 26 हजार मतदारांची त्यांच्या 2002 मधील मतदार यादीतल्या नावाशी जोडणी (मॅपिंग) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यातील येरवडा भागातून मतदारांचा प्रतिसाद बरा आहे. तर वडगाव शेरी, विमाननगर, लोहगाव, धानोरी, खराडी या परिसरातून मतदारांचा प्रतिसाद कमी आहे.वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीच्या भवानीपेठ, बोपोडी आणि हवेली या विधानसभा मतदारसंघातील भाग जोडून बनला आहे. त्यामुळे वडगाव शेरीतील सध्याच्या मतदारांची नावे 2002 च्या मतदार यादीत शोधताना पूर्वीच्या तीन विधानसभा मतदार संघाच्या जुन्या याद्यांमध्ये नावांचा शोध घ्यावा लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु