रत्नागिरी : सुवर्णपदक विजेत्या बालवैज्ञानिक स्पृहा भावेचा भाजपकडून सत्कार
रत्नागिरी, 10 एप्रिल, (हिं. स.) : भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची विद्यार्थिनी कु. स्पृहा भावे हिने सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भाजपाने तिचा सत्कार केला. बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या डॉ. होमी
स्पृहा भावेचा सत्कार


रत्नागिरी, 10 एप्रिल, (हिं. स.) : भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची विद्यार्थिनी कु. स्पृहा भावे हिने सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भाजपाने तिचा सत्कार केला.

बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची सहावीतील विद्यार्थिनी कु. स्पृहा तेजराज भावे रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव सुवर्णपदक विजेती ठरली आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराने याची दखल घेऊन शहर मंडळाच्या वतीने स्पृहाचा सत्कार करण्यात आला.

सुमारे ४५ वर्षाहून अधिक काळ बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघटना शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन अभ्यासासाठी जागृती निर्माण होण्यासाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचीही नोंद घेतली जाते. या मानांकित स्पर्धेमध्ये देशभरातून लाखाहून अधिक विद्यार्थी भाग घेतात. विभागीय स्तरावर स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर विभाग नेमून देण्यात आला होता. स्पर्धेमध्ये सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची त्यानंतर कोल्हापूर येथे प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात आली. त्यात रत्नागिरी जिल्ह्यामधील ४ स्पर्धक उत्तीर्ण झाले. त्यापैकी रत्नागिरी तालुक्यामधून केवळ फाटक हायस्कूलची कु. स्पृहा तेजराज भावे उत्तीर्ण झाली.

स्पर्धेच्या पुढील टप्प्यावर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक विषय दिला जातो आणि त्याबाबत त्यांनी स्वत: अभ्यास करून स्वत: मिळविलेल्या माहितीनुसार त्या प्रकल्पाची माहिती स्वहस्ताक्षरामध्ये लिहून, थोडक्यात तो शोधनिबंध मुंबईत स्पर्धा समितीकडे पाठवावा लागतो. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्प अहवालविषयक एक आणि सर्वसामान्य ज्ञानविषयक दुसरी मुलाखत घेतली जाते. त्यानंतर विजेत्याला पदक प्रदान करण्यात येते. यावर्षीच्या उपक्रमात यावर्षी एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यंदाच्या स्पर्धेची संकल्पना पृथ्वी प्रणाली आणि मानवी कृती (हस्तक्षेप) असा होता. या विषयावर माणसाच्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक संपत्तीमध्ये कसे परिणाम होतात, याबाबतचा प्रकल्प सादर करावयाचा होता. स्पृहाने “शाश्वत शेती आंब्याची दिशा कोकणच्या विकासाची” असे घोषवाक्य घेऊन कोकणातील आंबा हे नगदी पीक, त्याची सध्याची परिस्थिती, रासायनिक खते, औषधांचा दुष्परिणाम, कमी होणारे उत्पादन आणि त्याबरोबर सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीनेच आंबा पीकाची देखभाल करणे कसे फायद्याचे होऊ शकेल, याबाबतची उपाययोजना याविषयीचा प्रकल्प अहवाल सादर केला होता.

प्रकल्पासाठी तिला रत्नागिरीतील डॉ. स्वप्नजा मोहिते, नारळसंशोधन केंद्राचे डॉ. मालशे आणि कीटकशास्त्र विभागाचे डॉ. वानखेडे, कृषि अधिकारी हेगडे, तंत्रज्ञ काळे, प्रा. मंगल पटवर्धन, डॉ. संजय केतकर, आंबा बागायतदार अमित मुळ्ये, पराग गोगटे, गांडूळ खताची निर्मिती करणाऱ्या भारती जोशी. कलाशिक्षक पावसकर, फाटक हायस्कूलचे सर्व शिक्षक आणि संस्थाचालकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

स्पृहाला ५ एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात संरक्षण मंत्रालयातील निवृत्त डीआरडीओ स संचालक डॉ. ए. जी. नगरकर यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या तिच्या सत्काराला भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, संदीप सुर्वे, नीलेश आखाडे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा पदाधिकारी शेखर लेले आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande