वाडिया हॉस्पिटलचा कायापालट सुरू; १०० बेड नूतनीकरण प्रकल्पाला गती
सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून, उर्वरित १०० बेडच्या नूतनीकरणाच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. या
wadd


सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून, उर्वरित १०० बेडच्या नूतनीकरणाच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष भेट देत कामाचा आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्यात महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता ताई चाकोते यांनी उपस्थित राहून प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी हॉस्पिटलचे सेक्रेटरी डॉ. शिरीष गोडबोले, डॉ. राजेंद्र घुले, प्रशासन अधिकारी सचिन देशपांडे तसेच डॉ. ज्ञानेश्वर सोडल उपस्थित होते.पाहणीदरम्यान सुरू असलेल्या नूतनीकरण कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा, अद्ययावत उपकरणे, रुग्णांसाठी अधिक सोयीस्कर व्यवस्था आणि उच्च दर्जाची स्वच्छता राखण्यावर विशेष भर दिला जात असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.महापौर विनायक कोंड्याल यांनी नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सुविधा पुरविणे हीच प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करत, या प्रकल्पामुळे शहराच्या आरोग्य सेवेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी कामाची गती वाढवून सुविधा लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

नूतनीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाडिया हॉस्पिटलमधील आरोग्य सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख होणार असून, सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून हा प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.या उपक्रमामुळे सोलापूर शहराच्या आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande