
छत्रपती संभाजीनगर, ११ एप्रिल (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील ज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त रविवारी (दि. १२ एप्रिल) १८ तास सलग वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, १२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजल्यापासून वाचन अभियानास सुरुवात होणार आहे. यावेळी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, संचालक डॉ. वैशाली खापर्डे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे आणि अध्यासनाचे संचालक डॉ. सुनील नरवडे उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमासोबतच ग्रंथालयात विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी आणि वाचकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. वैशाली खापर्डे यांनी केले आहे.
दरम्यान, जयंती महोत्सवानिमित्त ‘आंबेडकरी जलसा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या नाट्यगृहात रविवारी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार असून, मिलिंद कला महाविद्यालय, केएसके महाविद्यालय, दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, सरस्वती भुवन कला महाविद्यालय तसेच विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे.या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला चालना मिळण्यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवा अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis