वारकरी संप्रदायातील प्रतिगामींवर अमोल मिटकरींची टीका
अकोला, 11 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वारकरी संप्रदायातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत प्रतिगामी विचारसरणीवर कडाडून टीका केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करताना, संप्रदायाती
वारकरी संप्रदायातील प्रतिगामींवर अमोल मिटकरींची टीका


अकोला, 11 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वारकरी संप्रदायातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत प्रतिगामी विचारसरणीवर कडाडून टीका केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करताना, संप्रदायातील बदलत्या प्रवृत्तीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

मिटकरी म्हणाले की, वारकरी संप्रदायात सध्या ५० ते ६० टक्के लोक प्रतिगामी विचारांचे झाले असून पुरोगामी विचार जपणाऱ्यांची संख्या केवळ २० ते ३० टक्क्यांवर आली आहे. धर्माच्या नावावर वाढणाऱ्या वादग्रस्त प्रवृत्तींबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

अध्यात्मिक आघाडीच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विचारले की, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील संस्था तसेच आळंदीतील खासगी शिक्षण संस्थेत मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या तेव्हा संबंधित आचार्य गप्प का होते?

यावेळी संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज आणि संत चोखामेळा यांनी दिलेल्या मानवतेच्या शिकवणीचा उल्लेख करत, त्या मूल्यांपासून समाज दूर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणाचा संदर्भ देत त्यांनी आपल्या भूमिकेची पुष्टी केली.

दरम्यान, राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या हेलिकॉप्टर लँडिंग प्रकरणावरही मिटकरी यांनी संताप व्यक्त केला. हेलिपॅड उपलब्ध असताना हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर त्यांनी कडक टीका केली.

“व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर प्रकार असून पायलटसह प्रशासनाचीही ही मोठी चूक आहे,” असे ते म्हणाले. तसेच यापूर्वी अजित पवार यांच्या बाबतीतही अशाच प्रकारची घटना घडल्याची आठवण त्यांनी करून दिली.

या प्रकरणात संबंधितांवर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande