
अकोला, 11 एप्रिल (हिं.स.) : भारतीय लोकशाहीचा सर्वोच्च ग्रंथ असलेल्या भारतीय संविधान चे सिंधी भाषेतील अधिकृत संस्करण प्रथमच प्रकाशित करण्यात आले असून, या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान अकोल्यातील सिंधी समाजाला मिळाला आहे.
सिंधी भाषा दिनाच्या औचित्याने सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवन येथे या संविधानाचे दिमाखदार विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील मान्यवरांसह अकोल्याच्या शिष्टमंडळाने विशेष उपस्थिती दर्शवली.
अकोल्यातील माजी नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते हरिशभाई आलिमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने या राष्ट्रीय सोहळ्यात सहभाग घेत जिल्ह्याची मान उंचावली. तसेच अकोल्याचे युवा खासदार अनुप धोत्रे यांची उपस्थितीही विशेष ठरली.
सिंधी भाषेतील संविधान देवनागरी आणि फारसी या दोन्ही लिपींमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे, ज्यामुळे भाषेचा वारसा जपण्यास मदत होणार आहे. यावेळी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणात सिंधी समाजाच्या संघर्षशील इतिहासाचे कौतुक करत फाळणीनंतर मातृभाषेने समाजाला एकत्र ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले.
मातृभाषेत संविधान उपलब्ध झाल्यामुळे लोकशाहीची मूल्ये समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील आणि नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास अर्जुन राम मेघवाल, वासुदेव देवनानी, शंकर लालवानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अकोल्यातील सिंधी समाजाच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा अधिकच भव्य झाला असून, हा क्षण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे-------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे