
अकोला, 11 एप्रिल (हिं.स.) : केंद्र शासनाने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केल्याने कामगार कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी ठरणार असून कामगारांचे हक्क बळकट होतील, असे प्रतिपादन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत आयोजित “नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५” वितरण सोहळा जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, संचालक (बाष्पके) ध. प्र. अंतापूरकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १६०० कारखाना प्रतिनिधींनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. राज्यातील सुरक्षा व आरोग्य विषयक उत्कृष्ट कामगिरीबद्दल धोकादायक तसेच धोकादायक नसलेल्या उद्योगांचा गौरव करण्यात आला. विविध श्रेणींमध्ये एकूण २४ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या असून औद्योगिक संरचनेत लवचिकता आल्याने उद्योग आणि कामगार दोघांनाही फायदा झाला आहे. उत्पादकतेत वाढ झाली असून उद्योगस्नेही वातावरण निर्माण झाले आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग आणि कामगार या दोघांचेही हित जपले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांना जलद सेवा मिळावी यासाठी मानवी हस्तक्षेपविरहित प्रणालीवर भर देण्यात येत असून विविध सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. यामुळे तक्रारींचे त्वरित निवारण होण्यास मदत होत आहे. महिला कामगारांच्या सक्षमीकरणासाठी पूर्वी प्रतिबंधित असलेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्याची संधी देण्यात आली असून आवश्यक सुरक्षा उपायांसह रात्रीच्या पाळीत काम करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी सांगितले की, नवीन कामगार संहितेमुळे वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षितता या क्षेत्रांमध्ये एकसंध कायदेशीर चौकट निर्माण झाली असून यामुळे कामगारांना अधिक सुरक्षितता व आरोग्यदायी वातावरण मिळेल.
कार्यक्रमात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक दीपक पोकळे यांनी प्रास्ताविक केले. तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विषयावर पॅनल चर्चा आणि “व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता, २०२०” या विषयावर प्रशिक्षण सत्र पार पडले.
औद्योगिक सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी १२ एप्रिल २०२६ रोजी नवी मुंबईतील पाल्म बीच रोड येथे “Run for OSH-2026” या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे