परभणीत दुग्ध व्यवसायाला चालना; दररोज ५० हजार लिटर दूध उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट
परभणी, 11 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यात धवलक्रांती घडवून आणत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाचा विस्ता
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध व्यवसायाला चालना; आ. डॉ. राहुल पाटील यांचा पुढाकार


परभणी, 11 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यात धवलक्रांती घडवून आणत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्यावर भर देत जिल्ह्यात दररोज ५० हजार लिटर दूध उत्पादन वाढविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर समसापूर येथे सरपंच रमेशराव चोपडे यांच्या डेअरीला भेट देऊन आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. भेटीदरम्यान तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी (बीडीओ), विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागातील अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर उपस्थित होते.

यानंतर साडेगाव व मिर्झापूर या गावांना भेट देत ग्रामीण भागातील आरोग्य समस्या तसेच दुग्ध व्यवसायातील अडचणी जाणून घेण्यात आल्या. त्यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

डेअरीचे सखोल निरीक्षण करत गाई-म्हशींच्या आरोग्याविषयी माहिती घेण्यात आली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

“दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी दैनंदिन उत्पन्नाचा विश्वासार्ह स्रोत ठरावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांच्या समस्या व सूचनांचे स्वागत असून एकत्रित प्रयत्नातून परभणी जिल्ह्यात धवलक्रांती घडवून आणू,” असे मत आ. डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केले.

------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande