
लातूर, 11 एप्रिल (हिं.स.)।उदगीर निलंगा राज्य मार्गावरील वलांडी परिसरातील खंडोबा मंदिराजवळील अपूर्ण पुलावरून घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूरज सूखवास सूर्यवंशी (वय ३०, रा. तळेगाव, शिऊरअनंतपाळ) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज सूर्यवंशी हा ओंकार साखर कारखान्यात एक वर्षापासून कार्यरत होता. दोनतीन दिवसांपूर्वी तो ड्युटीसाठी घरून निघाल्यानंतर परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. फोन बंद असल्याने नातेवाईकांनी सहकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ड्युटी संपवून तो गेला आहे, अशी माहिती मिळाली.
वलांडी येथील शेतात कामाला जात असलेल्या शेतकऱ्यांना खंडोबा मंदिराजवळील पुलाच्या खालील खड्यातून येणारा दुर्गंधीचा वास जाणवला. त्यांनी खाली पाहिले असता एक मृतदेह आणि हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (एमएच १४ सीए १६९२) दिसून आली. पुलाला कठडे नसल्यामुळे घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले. देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वन्हाडे व वलांडी बिटचे राजेश लामतूरे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून नातेवाईकांना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis